मुंबईत मराठी गुजराती वाद ! मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या मॅनेजरला शिवसेनेनं दाखवला इंगा; हात जोडून मागितली माफी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत सर्व धर्म, पंथ, भाषा आणि प्रदेशातील व विदेशातीलही नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. मात्र, येथे सातत्याने मराठी माणसांवरच जोरजबरदस्ती केल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मराठी माणसांना त्रास दिला जात असल्याचे, तसेच मराठी बोलणार नसल्याचे सांगत ठणकावल्याचं पाहायला मिळालं होतं. आता, पुन्हा एकदा भाषिक वाद समोर आला असून एका शोरोममधील मॅनेजरकडून मराठी बोलण्यास नकार दिल्याची व ग्राहकाला मराठी न बोलण्याची अरेरावी केल्याची घटना उघडकीस आली आहे. मराठी गुजराती वाद समोर आला असून, मराठीत नको तर हिंदी किंवा गुजरातीत बोला, अशी धमकीच रुपम शोरुममधील मॅनेजरने मराठमोळ्या ग्राहकाला दिली. त्यानंतर, स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर दिल्याने त्याने माफी मागितली. मॅनेजरकडून होत असलेल्या अमराठी भाषेच्या जबरदस्तीविरोधात ठाकरेंच्या शिवसेना विभाग प्रमुखांनी शोरुममध्ये जाऊन मॅनेजरला समज दिली. त्यानंतर, हा वाद संपुष्टात आला. तत्पूर्वी, क्रॉफर्ड मार्केटमधील रुपम शोरुमच्या मॅनेजरने मराठी तरुणाला गुजराती किंवा हिंदीमध्ये बोलण्यास जबरदस्ती केली होती. मी मराठी बोलणार नाही, असे या मॅनेजरने म्हटले, तसेच ग्राहकालाही हिंदी किंवा गुजराती भाषेत बोलण्यासाठी दम दिला. त्यामुळे, सदर ग्राहक तरुणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्याकडे त्याची तक्रार केली. त्यानंतर, सदर मॅनेजरला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेना स्टाईलने समज दिली, व त्यास मराठी बोलायला लावले. तसेच, मराठी लोकांची माफी मागायला लावली, त्यानंतर हा विषय इथेच संपला.
गिरगावातील रहिवाशी खरेदीसाठी गेले असता, त्या ठिकाणच्या मॅनेजरने भाषिक वाद घातला. तुम्ही हिंदी आणि गुजरातीमध्ये बोला, असे त्यांनी म्हटले. त्यावर, मराठी कुटुंबीयांनी नकार दिला. तसेच, आम्ही महाराष्ट्रात आहोत आणि मराठीतच बोलणार असे म्हटले. या प्रकारानंतर आम्ही त्याठिकाणी गेलो आणि संबंधित मॅनेजरला माफी मागायला लावली. तसेच, आम्ही त्याला ठणकावून सांगितले की, येथील रहिवाशी हे मराठीतच बोलणार,असे शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी सांगितले. गेल्या काही ४-५ महिन्यांपासून मराठी माणसाची गळचेपी केली जात आहे का? मला वाटतं, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पुन्हा सुरू करावी लागणार का हा सर्व प्रकार सुरु आहे, हे सरकार फसवं सरकार आहे. मरीन लाईन स्थानकाचे नाव बदलले जाणार आहे, पण त्याचे नाव दिले नाही. मुंबई सेंट्रल स्थानकाचे नाव बदलले पाहिजे म्हणन आम्ही मागणी करत आहे. सीएसएमटी स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला पाहिजे. पण हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. मराठी माणसांसाठी २५% घर ही टॉवर आणि नव्या इमारतीत राखीव ठेवायला हवी, अशी आम्ही मागणी केली आहे. मात्र, हे सरकार गद्दार आणि खोक्यांच आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार, अशी टीकाही संतोष शिंदे यांनी केली.