पनवेल पोलिसांची मोठी कारवाई, सराईत ऑटो रिक्षा चोराला अटक, १८ रिक्षा जप्त
पनवेल – पनवेल शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत सराईत ऑटो रिक्षा चोरास अटक केली असून, तब्बल १८ ऑटो रिक्षा जप्त केल्या आहेत. या तपासातून १७ ऑटो रिक्षा चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत. या सर्व ऑटो रिक्षा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे आढळून आल्या. गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असता, निसार रास्तार खान (वय ३६, रा. पनवेल, मूळ रा. मेहकर, बुलढाणा) हा संशयित इसम आढळला. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ४ किमी पाठलाग करून त्याला अटक केली. चौकशीत त्याने १ वर्षात १८ ऑटो रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांना आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मेहकर येथे धाड टाकून १८ ऑटो रिक्षा जप्त केल्या. त्यातील १० ऑटो रिक्षा पनवेल शहर पोलीस ठाण्यातील, ४ कळंबोली पोलीस ठाण्यातील, ३ कामोठे पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत १२.४५ लाख रुपये किमतीच्या १८ ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या मूळ मालकांना परत करण्यात येणार आहेत.
सदर कारवाई पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक शाकिर पटेल, अभिजीत अभंग, तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील प्रकाश पयार, विनोद लभने, नितीन वाघमारे, परेश म्हात्रे आदी अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पनवेल पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील ऑटो रिक्षा चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे.