जामीन झाला नाही तर एके ४७ घेऊन येतो’ अशी धमकी देणारा अटकेत तर पोलिस अधिकाऱ्याची उचलबांगडी

Spread the love

जामीन झाला नाही तर एके ४७ घेऊन येतो’ अशी धमकी देणारा अटकेत तर पोलिस अधिकाऱ्याची उचलबांगडी

योगेश पांडे/वार्ताहर 

कल्याण – लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पिडीत कुटुंबाच्या घराबाहेर ३ तरुणांनी कल्याणमध्ये मध्यरात्री दहशत माजवण्याच्या प्रयत्न केला आहे. जामीन झाला नाही तर आम्ही एके ४७ घेऊन येतो आणि दाखवतो. अश्या प्रकारची धमकी आणि शिवीगाळ कुटुंबीयांना देण्यात आली आहे. पोलिसांकडून वारंवार सुरक्षेची मागणी करून देखील पोलीस पर्याप्त सुरक्षा देत नाही, असा गंभीर आरोप पीडित मुलीच्या कुटुंबाने केला आहे. या घटनेनंतर संपुर्ण कल्याण हादरून गेलं आहे. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत डीसीपी अतुल झेंडे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांची तडकाफडकी बदली केली आहे. कल्याण पूर्वेत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात कोळशेवाडी पोलिसांनी आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला अटक केली. दोघे ही सध्या जेलमध्ये आहेत. या प्रकरणात तीन महिन्यांमध्ये आरोपीला फाशी होईल असे आश्वासन पोलिस आणि राजकीय नेत्यांनी दिले आहे. या प्रकरणाची चार्जसीट अजून तयार झालेली नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे मंत्री गणेश नाईक, कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन सांत्वन केले होते. शिवाय आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल असे आश्वासन दिले होते.

आता याप्रकरणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित कुटुंबाच्या घराबाहेर रविवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास तीन तरुण एका दुचाकीवर आले होते. तिघांपैकी एक तरुण शिवीगाळ करत होता. त्यानंतर एका दुकानाच्या बाहेर ठेवण्यात आलेले ट्रे त्याने फेकून दिले. आरोपीचा जामीन झाला नाही तर आम्ही एके ४७ घेऊन येतो आणि तुला दाखवतो. अशा शब्दात परिसरात दहशत माजवली. या संपुर्ण घटनेनं पिडीत कुटुंब हादरून गेलं आहे.आधीच त्यांची चिमुकली त्यांनी गमावली आहे. त्यात आरोपीकडून अशी दहशत माजवली जात आहे.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर पीडित कुटुंब घाबरले आहे. वारंवार कोळशेवाडी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली. मात्र पोलीस सुरक्षा देत नाही, असा आरोप पीडित मुलीच्या वडीलांनी केला आहे. आता हा प्रकार घडला आहे. एवढेच नाही तर विशाल गवळी याच्या तिघा भावांना तडीपार केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र त्यापैकी दोन भाऊ या परिसरात फिरत असल्याचे ही पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सदर घटना ही गंभीर आहे .या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी लवकरच शोधावे आणि कायदेशीर कारवाई करावी. पीडित कुटुंबीयांना पुरेशी सुरक्षा द्यावी आणि हा प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावा. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल याची काळजी घ्यावी, अशी मागणी केली आहे .या प्रकरणात इतर राजकीय नेत्यांनी देखील कोळसावाडी पोलीस स्टेशनला भेट देऊन पीडित कुटुंबाच्या सुरक्षेची मागणी केली आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत डीसीपी अतुल झेंडे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांची तडकाफडकी बदली केली आहे. त्यांची रवानगी आता कल्याण पोलीस कंट्रोलमध्ये करण्यात आली आहे. पीडित कुटुंबाला सुरक्षा देण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सुरक्षा पुरवण्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शिवाय या कारवाईनंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी पुरुषोत्तम शेलार याला अटक केली आहे. तर अजून दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon