सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठा धक्का; सर्व १९ नमुने जुळले नाहीत
अटक केलेला आरोपी शरीफूल आणि सैफ अली खानच्या घरात मिळालेले बोटांचे ठसे अनमैच?
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा तपास अद्यापही सुरू आहे. आरोपी शरीफूल शहजाद याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. सैफ हल्ला प्रकरणात आरोपीने गुन्हा कबुल केल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. मात्र आता या प्रकरणात एक हैराण करणारी बाब समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सैफ अली खानच्या घरातून घेतलेल्या बोटांच्या ठसांचे नमुने काही दिवसांपूर्वी स्टेट सीआयडीला पाठवले होते. पकडलेला आरोपी आणि सैफच्या घरात घुसलेला आरोपी एकच आहे का हे पाहण्यासाठी नमुने तपासणीसाठी पाठवले होते.
मात्र सीआयडीने याबाबत मुंबई पोलिसांकडे एक अहवाल दिला, जो हैराण करणारा आहे. या अहवालानुसार, अटक केलेला आरोपी शरीफूल आणि सैफ अली खानच्या घरात मिळालेले बोटांचे ठसे एक नाहीत. यावरुन अटक केलेल्या व्यक्तीने सैफ अली खानवर हल्ला केलेला नाही, असंच स्पष्ट होतं. पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला पकडलं आहे का? असाही सवाल उपस्थित होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी सैफ अली खानच्या फ्लॅटमधून बोटांच्या एकूण १९ नमुन्याच्या तपासणीसाठी पाठवले होते. राज्याच्या सीआयडीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं, सर्व बोटांचे ठसे शरीफूलशी मॅच होत नाही. आरोपी शरीफूलच्या सर्व दहा बोटांचे ठसे राज्य सीआयडीला पाठवलं होतं. दोन्ही जुळवून पाहण्यात आलं, यावेळी दोन्ही बोटांचे ठसे वेगवेगळे असल्याचं समोर आलं. पोलिसांनी आता हा रिपोर्ट पुण्यातील सीआयडी अधीक्षकांना पाठवलं आहे.