मुंबई – नाशिक महामार्गावर भीषण अपघात, डोंबिवलीच्या दंपत्तीचा जागेवर मृत्यू; क्षणात संसार उद्धवस्त
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – शहापूर तालुक्यातील कलमगाव जवळ मुंबई-नाशिक महामार्गावर शुक्रवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात डोंबिवली येथील रोहन दत्तात्रय लुगडे ( ३२) आणि त्यांची पत्नी अवंतिका रोहन लुगडे वय (२८) या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोन दुचाकींमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी शहापूर तालुक्यातील कळमगाव परिसरात मुंबई-नाशिक महामार्गावर दोन दुचाकी एकमेकांना समोरासमोर धडकल्या. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवर प्रवास करणारे कल्याण-डोंबिवली येथील रहिवासी रोहन लुगडे व अवंतिका रोहन लुगडे हे पती-पत्नी यांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर दोघेही रस्त्यावर पडलेले असल्याचे स्थानिकांनी पाहिले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. तसेच शहापूर पोलिस आणि रुग्णवाहिकेला घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वेग, निष्काळजीपणा की इतर काही कारण होते याचा तपास शहापूर पोलीस करत आहेत.