जंगली रमी खेळण्याच्या नादात कर्जबाजारी झालेल्या युवकाने रेल्वेतून ७ लाख रुपयांचे दागिने केले लंपास

Spread the love

जंगली रमी खेळण्याच्या नादात कर्जबाजारी झालेल्या युवकाने रेल्वेतून ७ लाख रुपयांचे दागिने केले लंपास

कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी आरोपी तरुणाला पुण्यातून ठोकल्या बेड्या; सात लाखांचे दागिने केले हस्तगत

योगेश पांडे/वार्ताहर 

कल्याण – ऑनलाईन गेम ‘जंगली रमी’ खेळण्याचा नादात एका तरुणाने धावत्या ट्रेनमधून ७ लाखांचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी योगेश चव्हाण नावाच्या तरुणाला सीसीटीव्हीच्या साहायाने पुण्यातून अटक केली आहे. त्याने चोरलेले सात लाखांचे दागिने देखील पोलिसांनी हस्तगत केले आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल नावाचा व्यक्ती सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून सोलापूर ते कल्याण प्रवास करत होता. दागिन्यांनी भरलेली बॅग राहुल यांनी आपल्या सीटवर ठेवली होती. प्रवासादरम्यान त्यांना झोप लागली. पुणे स्टेशनच्या पुढे आल्यानंतर त्यांना जाग आली. त्यावेळी त्यांनी पाहिलं की त्यांनी सीटवर ठेवलेली दागिन्यांची बॅग गायब आहे. आपली बॅग चोरीला गेल्याची त्यांना खात्री पटली.

कल्याण स्टेशन येताच त्यांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात याची तक्रार केली. कल्याण जीआरपी पोलीस या प्रकरणाच्या तपास करत होते. कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी तपास सुरू केला. रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी कल्याण ते पुणेपर्यंत सर्व रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही चेक केले. पुणे रेल्वे स्थानकात एक तरुण स्टेशनवर फिरताना पोलिसांना दिसून आला. सीसीटीव्हीच्या साह्याने पोलिसांनी या प्रकरणाच्या तपास सुरू केला. अखेर सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या तरुणाची ओळख पटली. योगेश चव्हाण असे या तरुणांचे नावे आहे. कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी तातडीने कारवाई करत योगेश चव्हाणला पुण्यातून ताब्यात घेतले. योगेशकडे विचारपूस केली असता त्याने सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये चोरी केल्याचे मान्य केले. रेल्वे पोलिसांनी योगेश यांचे चोरीला गेलेले सर्व दागिने हस्तगत केले आहे. पोलिसांना तपासादरम्यान कळालं की, योगेश चव्हाण याला जंगली रमी खेळण्याच्या नाद आहे. या नादात तो कर्जबाजारी झाला आहे. त्याला हा खेळ पुढेही खेळायचा होता. त्यासाठी त्याने ट्रेनमध्ये चोरी केली होती. रेल्वे क्राईम ब्रँच या प्रकरणाच्या पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon