ईडी च्या कारवाईत क्रिकेटपटूंसह ७ सेलिब्रिटीज अडकले; युवराज – उथप्पाची मालमत्ता जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
नवी दिल्ली – ऑनलाईन सट्टेबाजी 1X बेट ऍप प्रकरणी ईडीने भारतीय क्रिकेटर युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजची कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ज्या सेलिब्रिटीजची संपत्ती जप्त करण्यात आली त्यात युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांच्यासोबत उर्वशी रौतेला, सोनू सूद, मिमी चक्रवर्ती, अंकुश हजारा आणि नेहा शर्मा अशा मोठ्या नावांचा समावेश आहे.
युवराज सिंग- २.५ कोटी रुपये,रॉबिन उथप्पा- ८.२६ लाख रुपये,उर्वशी रौतेला- २.०२ कोटी (ही संपत्ती तिच्या आईच्या नावावर),सोनू सूद- १ कोटी रुपये,मिमी चक्रवर्ती- ५९ लाख रुपये, अंकुश हजारा- ४७.२० लाख रुपये आणि नेहा शर्मा- १.२६ कोटी रूपये.
ईडीने शुक्रवारच्या कारवाईमध्ये एकूण ७.९३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. याआधी ईडीने शिखर धवन याची ४.५५ कोटींची तर सुरेश रैनाची ६.६४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. आतापर्यंत ईडीने 1X बेट प्रकरणी तब्बल १९.०७ कोटींची संपत्ती जप्त केली आहे, तसंच प्रकरणाचा तपास सुरू आहे.