डेक्कन पोलिसांची मोठी कारवाई; मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला घेतले ताब्यात
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रात्रीच्यावेळी कॅबची वाट पाहणाऱ्या तसेच रस्त्याच्या कडेला उभारलेल्या नागरिकांचे अंधाराचा फायदा घेऊन मोबाईल हिसकावणाऱ्या सराईताला डेक्कन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून चार मोबाईल जप्त केले असून, तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. हबीब अबालु इराणी (२४) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून डेक्कनमधील दोन व बाणेरमधील एक असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे निरीक्षक प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले यांच्या पथकाने केली आहे. पुणे शहरात मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पादचारी, दुचाकीस्वार व वाहनांची वाट पाहत थांबलेल्या नागरिकांकडील मोबाईल हिसकावून नेल्याच्या घटना घडत आहेत. डेक्कन परिसरात देखील दोन घटना घडल्या होत्या. यापार्श्वभूमीवर डेक्कन पोलीस हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा हबीब इराणी याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने त्याला सापळा कारवाई करून पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून चार मोबाईल मिळाले.
सखोल तपास केला असता त्याने डेक्कन तसेच बाणेर व येरवड्यात मोबाईल हिसकावल्याची कबूली दिली. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले असून, त्याने आणखी कोठे मोबाईल हिसकावले आहेत का याबाबत पोलीस तपास करत आहेत. त्याच्यावर यापुर्वीचे देखील गुन्हे नोंद असून, यापुर्वी त्याच्यावर लोहमार्ग पोलीस, यवत तसेच हडपसर पोलिसांत गुन्हे नोंद असल्याचे सांगण्यात आले.