कल्याणमधील तीन भाऊ दोन वर्षासाठी ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातून तडीपार, पोलीस उपायुक्तांचा दणका

Spread the love

कल्याणमधील तीन भाऊ दोन वर्षासाठी ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातून तडीपार, पोलीस उपायुक्तांचा दणका

आकाश अभिमान गवळी, शाम अभिमान गवळी आणि नवनाथ अभिमान गवळी या तीन भावांची ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून तडीपारी

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – कल्याण शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. मात्र, गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे परिमंडळ – ३ चे डॅशिंग, दबंग पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कारभाराची सूत्रे हाती घेताच गुन्हेगारीचा बिमोड करण्याचा विडाच उचलला असल्याचे त्यांच्या कारवाईतून दिसून येत आहे. कल्याण पूर्व चक्कीनाका भागात प्रचंड दहशत माजवणारे, कोळेसवाडी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील खतरनाक गुन्हेगार आकाश अभिमान गवळी (३३), शाम अभिमान गवळी ( ३४) आणि नवनाथ अभिमान गवळी (२८) या तीन भावांना ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्याचा निर्णय पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी घेतला आहे. या कारवाईने कल्याण, डोंबिवली शहरात अनेक वर्ष गुन्हेगारी करणाऱ्या गुंडामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कल्याण मधील कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत नियमित गुन्हे करणाऱ्या, दहशत पसरविणाऱ्या सक्रिय धोकादायक, खतरनाक गुंडांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. अशा गुंडावर संघटित गु्न्हेगारी कायद्याने तसेच हद्दपारीच्या कारवाया करण्यात येणार आहेत, असे उपायुक्त झेंडे यांनी सांगितले.

आकाश अभिमान गवळी, शाम अभिमान गवळी, नवनाथ अभिमान गवळी हे तिन्ही भाऊ कल्याण पूर्व भागातील नंदादीप सोसायटी, नंदादीप नगर, चक्कीनाका भागात राहतात. त्यांच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापती करणे, बेकायदा शस्त्र जवळ बाळगणे, मालमत्तेचे, गंभीर दुखापती करणे असे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या इसमांनी कल्याण पूर्व चक्कीनाका भागात दहशत निर्माण केली होती. लोक या तिन्ही इसमांना प्रचंड घाबरत होते. आपण कोणालच घाबरत नाही. आपणास कोणी काही करणार नाही अशी दर्पोक्ती या तिन्ही गुंड भावांची होती. स्थानिक नागरिक, व्यावसायिक, विक्रेते या गुंडांच्या त्रासाने त्रस्त होते. याविषयीच्या वाढत्या तक्रारी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात येत होत्या. पोलीस उपायुक्त झेंडे यांना हे प्रकार समजल्यावर त्यांनी या तिन्ही इसमांची गु्न्हे विश्वातील माहिती संकलित करण्याचे आदेश कोळसेवाडी पोलिसांना दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी या तिन्ही भावांना महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम ५५ प्रमाणे तडीपार करण्यासाठीचा प्रस्ताव उपायुक्त अतुल झेंडे यांच्यासमोर ठेवला होता. उपायुक्तांनी तातडीने हा प्रस्ताव मंजूर केला. या तिन्ही भावांना पोलिसांनी तडीपाराच्या नोटिसा बजावल्या. त्यांना ताब्यात घेऊन सातारा जिल्हा हद्दीत तडीपारीची कारवाई म्हणून सोडण्यात आले. चक्कीनाका येथे बालिकेची हत्या करणारा विशाल गवळी सध्या पत्नीसह तुरुंगात आहे. या कारवाईने कल्याण पूर्वेतील चक्कीनाका, तिसगाव परिसरातील रहिवासी, व्यापारी, विक्रेते, व्यावसायिक यांनी समाधान व्यक्त केले आहे.

बॉक्स कल्याण पूर्वेत गुंडगिरी करणाऱ्या सक्रिय गुन्हेगारांची यादी कोळसेवाडी पोलिसांनी तयार केली आहे. लवकरच पोलिसांच्या अभिलेखावरील अशा सराईत गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी, तडीपारीच्या कारवाया केल्या जाणार आहेत. – *अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ -३*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon