बनावट नोटांचं केंद्रबिंदू, दिल्ली आणि उत्तरप्रदेश ! पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश; दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त, पाच आरोपींना अटक
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला आहे. दिल्लीतून आणलेल्या तब्बल साडेदहा लाख रुपयांच्या बनावट नोटा पुणे पोलिसांनी जप्त केल्या आहेत. बनावट नोटाप्रकरणाचं दिल्लीसह गाझियाबाद आणि मुंबई कनेक्शन उघडकीस आलं आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. निलेश वीरकर, सैफान पटेल, अफजल शाह, शाहीद जक्की कुरेशी, शाहफहड अन्सारी अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. या पाच जणांकडून १० लाख ३५ हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथक पद्मावती भागात गस्त घालत होते. पद्मावती बस स्थानकाजवळ पोलिसांना पाहून एकजण स्वारगेटच्या दिशेने पळू लागला. पोलिसांनी त्याला पाठलाग करून अडवले आणि त्याची झडती घेतली, तेव्हा त्याच्या खिशातून ५०० रुपयांचे नोटांचे बंडल मिळाले. रात्रीच्या अंधारात तो बनावट नोटा वटवण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी पकडलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता आपल्याला शाहीद कुरेशी, सैफान पटेल, अफजल शाह यांनी नोटा दिल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांनी वीरकरला नवी मुंबईला नलं आणि तिथून शाहीदला अटक करण्यात आली. चौकशीमध्ये अन्सारीने त्याला बनावट नोटा दिल्याची माहिती दिली. यानंतर सहकारनगर पोलिसांनी एक-एक साखळी जोडत पाच जणांना अटक केली. या सगळ्यांकडून पोलिसांना १० लाख ३५ हजार रुपयांच्या पाचशेच्या २ हजार नोटा जप्त केल्या आहेत. या सर्व बनावट नोटा दिल्ली, उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून आणल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.