कोळशेवाडीतील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणी आरोपी पती -पत्नीला पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी, नागरिकांकडून संताप वक़्त करत फाशीची मागणी
योगेश पांडे/वार्ताहर
कल्याण – कल्याण पूर्व भागातील १३ वर्षीय मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसाची वाढ करण्यात आली आहे. मयत अल्पवयीन मुलीच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. लैंगिक अत्याचार झाल्यानंतर तिचा गळा दाबून केल्याचं अहवालात स्पष्ट झालं आहे. कल्याण कोळशेवाडीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन हत्या केल्याप्रकरणी आरोपी विशाल गवळी आणि साक्षी गवळी यांची सात दिवसांची पोलीस कोठडी बुधवारी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
दरम्यान, कल्याण न्यायालयाच्या बाहेर नागरिकांनी मानवी साखळी बनवत हातात पोस्टर घेत निषेध व्यक्त केला आहे. “जज साहब, बच्ची के हत्यारो को फासी दो” अशा आशयाची पोस्टर घेत केला लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी संताप व्यक्त केला. दुसरीकडे, कायदा आणि सुव्यवस्था बिघडून अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्यायालय परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कल्याण झोन तीनमधील आठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि शेकडो पोलीस कर्मचारी त्याचबरोबर उल्हासनगर, अंबरनाथ परिसरातील पोलीस कर्मचारी न्यायालय परिसरात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.