एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीकडून प्रवाशी युवकाची हत्या; जीआरपीने टोळीतील चौघांना घेतले ताब्यात
योगेश पांडे/ वार्ताहर
नागपूर – नागपूर रेल्वे स्थानकाआधी सुमारे ७० किलोमीटर अंतरावर सेवाग्रामजवळ एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. एका तरुणाला धावत्या रेल्वेत चार गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी बेदम मारहाण केली, या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव सुशांक राज असून, तो उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. त्याने या चौघांना मोबाईल फोन, पैसे आणि पाकीट चोरण्याला विरोध केला होता. त्यामुळे संतापून आरोपींनी सुशांकला मारहाण केली. याप्रकरणी जीआरपीने चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दक्षिण एक्सप्रेस हैदराबादहून दिल्लीला जात होती. जनरल बोगीत उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला २५ वर्षीय सुशांक रामसिंग राज देखील सिकंदराबादहून या ट्रेनच्या जनरल बोगीत बसला होता. रात्री अडीचच्या सुमारास सुशांकला झोप लागली. तो झोपला असताना त्याच्या शर्टच्या खिशातून चार आरोपींनी १७०० रूपये काढून घेतले.
त्यांनतर त्याच्या खिशातून आरोपी मोबाईल काढत असताना त्याला जाग आली आणि त्याने त्या प्रवाशाकडून चोरलेला मोबाईल हिसकावला. त्यानंतर चोरांनी त्याच्याकडील पैसै चोरले असल्याचंही त्याच्या लक्षात आलं आणि त्याने त्याचे पैसै परत मागितले. तरुणाने विरोध करत आरडा ओरड करायला सुरुवात केली. त्यानंतर या चार आरोपींनी त्याला बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केलं. वेळेवर उपचार मिळू न शकल्याने त्याचा रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर जनरल बोगीत उपस्थित इतर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. ट्रेनमध्येच तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर ट्रेनच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एस्कॉर्टिंग टीमने नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. यानंतर रेल्वे पोलिसांनी नागपूर स्थानकावर पोहोचण्यापूर्वी जनरल डब्यातील कोणत्याही प्रवाशांना खाली उतरू दिलं नाही. ही गाडी गुरुवारी सकाळी नागपूर स्थानकावर आल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर आरोपींची ओळख पटल्यानंतर चौघांनाही ताब्यात घेण्यात आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद फैयाज, सय्यद समीर, मोहम्मद अमत आणि मोहम्मद खेसर यांचा समावेश असून ते हैदराबादचे रहिवासी असून ते अट्टल चोर आहेत.