मैत्रीण बनली पक्की वैरीण ! बदलापुरात तरूणीला मद्यपाजून रिक्षाचालकाकडून अत्याचार; मैत्रिणीचा सहभाग, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love

मैत्रीण बनली पक्की वैरीण ! बदलापुरात तरूणीला मद्यपाजून रिक्षाचालकाकडून अत्याचार; मैत्रिणीचा सहभाग, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलीस महानगर नेटवर्क

बदलापूर – मध्यंतरी बदलापूरात चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे देशभर संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला होता. मात्र अशीच घटना पुन्हा एकदा घडली आहे. या प्रकरणात मैत्रिणीनेच मैत्रिणीचा घात केल्याचे दिसून येत आहे. बदलापूरमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पीडितेच्या मैत्रिणीने आधी तिला बियर पाजली. त्यानंतर तिची शुद्ध हरपल्यावर तिला रिक्षाचालक मित्र दत्ता जाधव याच्याकडे सोपवले आणि याचाच फायदा घेऊन त्या नाराधामाने पीडितेवर अत्याचार केला.

पीडित तरुणी ही मुंबईला राहणारी आहे. ती २१ डिसेंबर रोजी बदलापूरला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी बदलापूरच्या मैत्रिणीने दत्ता जाधव या तिच्या रिक्षाचालक मित्रालाही सोबत बोलावून घेतले. त्यानंतर या तिघांनी मद्यपान प्राशन केले. मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणीची शुद्ध हरपली आणि नराधमाने गिधाडासारखं लचके तोडून गैरफायदा घेत रिक्षाचालक दत्ता जाधव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणीच्या मैत्रिणीनेही या कृत्यात त्याची साथ दिल्याने पीडित तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिच्या लक्षात हा प्रकार आला.

पीडित तरुणीने याप्रकरणी २३ डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला व अवघ्या १२ तासात नराधम रिक्षाचालक दत्ता जाधव याला खरवई परिसरातून बेड्या ठोकल्या. पोलीस ज्यावेळेस त्याला अटक करण्यासाठी गेले, त्यावेळेस पोलिसांच्या भीतीने तो बहिणीच्या घरातील लोखंडी कपाटात लपून बसला होता. मात्र पोलिसांनी अतिशय शिताफिने त्याला शोधून काढत बेड्या ठोकल्या. त्याच्या या कृत्यात साथ देणाऱ्या त्याच्या मैत्रिणीलाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon