नवी मुंबईत वावरतोय करोडो रुपयांना चुना लावणारा कल्पेश पाटील नावाचा ठकसेन, पोलीसांत तक्रार दाखल

Spread the love

नवी मुंबईत वावरतोय करोडो रुपयांना चुना लावणारा कल्पेश पाटील नावाचा ठकसेन, पोलीसांत तक्रार दाखल

विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई – नवी मुंबईतील नवीन पनवेल परिसरात राहणाऱ्या कल्पेश वसंत तारमाळे-पाटील याने देशी दारूची अनुज्ञाप्ती देणाच्या बहाण्याने अमरावती येथील रहिवासी गिरीश यादवराव वावरे यांची १ करोड ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्याने कल्पेश तारमाळे-पाटील याची कल्याण अप्पर पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून त्यात या अनुज्ञाप्ती संदर्भात असणाऱ्या शिवम भस्मे, कविता राजेंद्र समयाणी, उत्तम धिंडळे, सुरेश लुल्ला यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गिरीश वावरे, रा.अमरावती यांना देशी दारू विक्रीची अनुज्ञाप्ती खरेदी करायची होती त्यासाठी त्यांनी त्यांच्या ओळखीची व्यक्ती राजू जैस्वाल व सुरेश कोल्हे यांना सांगितले असता त्यांनी राज्य उत्पादन शुल्क, छत्रपती संभाजीनगर विभागात काम करणारे कर्मचारी उत्तम धिंडळे यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी त्यांच्या खास ओळखीचे व नवीन पनवेल येथील मदिरा लिकर्स चे संचालक कल्पेश वसंत तारमाळे – पाटील यांच्याकडे देशी दारू विक्रीची अनुज्ञाप्ती असल्याचे सांगितले. कल्पेश तारमाळे-पाटील याने उल्हासनगर येथील सुरेश लुल्ला यांच्याशी संपर्क साधून कविता समयानी यांच्या नावे व विक्रीसाठी उपलब्ध असणारी अनुज्ञाप्ती सिएल-३,नं.३० या अनुज्ञाप्तीधारक असलेल्या कविता समयानी यांच्या उल्हासनगर येथील घरी घेऊन गेले असता तेथे सर्व कागदपत्रे तपासून कल्पेश तारमाळे-पाटील याने गिरीश वावरे यांच्याशी करारनामा करून ५ लाख रुपये आगाऊ रक्कम घेतली. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने आरटीजीएस व रोख रक्कम स्वरूपात कल्पेश तारमाळे-पाटील यांनी एकूण रु.१,३१,००,०००/- घेतलेले आहेत. सदर रक्कम देऊन जवळपास ९ ते १० महिने होऊन गेले तरी कल्पेश पाटील याने व त्यांच्या सर्व सहकारयांनी अनुज्ञाप्ती दिलेली नाही, सतत पाठपुरावा करून देखील अनुज्ञाप्ती किंवा पैसे परत केलेले नाहीत. कल्पेश तारमाळे- पाटील यास फोन केला असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असे. पुन्हा कधी फोन केला तर तुम्हाला जिथे असाल तेथून उचलून घेऊन येऊ तसेच पैसे देत नाही, तुम्हाला जे काही करायचे ते करा, माझी ओळख वरपर्यंत असून आम्ही कुणालाही घाबरत नाही तसेच माझ्या सोबत राज्य उत्पादन शुल्क चे अधिकारी उत्तम धिंडले असून त्यांची खूप मोठी ओळख आहे, तुम्ही कधी मुंबईत आलात तर तुम्हाला अमरावतीला पुन्हा जाऊ देणार नाही, त्यामुळे तुम्ही आमचे काहीच करू शकत नाही, अशाप्रकारे कल्पेश तारमाळे-पाटील सतत धमक्या देत असल्याचे म्हटले आहे. कधी कधी कल्पेश तारमाळे- पाटील हा नवी मुंबईतील कळंबोली येथील इंटरनेट लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार स्वताचं असल्याचा सर्व लोकांना सांगून फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच येथील डान्सबारच्या नर्तिकांवर पैसे उधळत असतो.

कल्पेश तारमाळे- पाटील, उत्तम धिंडळे, कविता समयाणी व सुरेश लुल्ला यांच्यापासून वावरे कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे वावरे यांचे म्हणणे आहे. कल्पेश तारमाळे-पाटील यास दिलेली एकूण रक्कम रु.१,३१,००,०००/- ही एचडीएफसी बॅँकेतून कर्ज घेऊन तसेच जमीन गहाण ठेऊन दिल्याचे समजते. कल्पेश पातीलच्या धमकीमुळे जगणं मुश्किल झाले आहे, डोक्यात सतत आत्महत्या करण्याचे विचार येत असतात असा आरोप वावरे यांनी केला आहे. फसवणूक व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कल्पेश तारमाळे-पाटील, त्याचा अंगरक्षक शिवम भस्मे व त्याचे सहकारी उत्तम धिंडळे, सुरेश लुल्ला व मालक कविता राजेंद्र समयाणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग,कल्याण यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon