एनआयएचा भिवंडी आणि अमरावती या दोन शहरांत छापा; पाकिस्तानच्या संपर्कात असलेला तरुण ताब्यात

Spread the love

एनआयएचा भिवंडी आणि अमरावती या दोन शहरांत छापा; पाकिस्तानच्या संपर्कात असलेला तरुण ताब्यात

योगेश पांडे/वार्ताहर 

भिवंडी – महाराष्ट्रातील भिवंडी आणि अमरावती शहरात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छापा टाकला आहे. एनआयएने या दोन्ही शहरांत छापा टाकून एक – एक तरुणाला ताब्यात घेतले आहे. भिवंडी आणि अमरावतीमधून ताब्यात घेतलेले तरुण पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात होते. त्या दोघांची कसून चौकशी सुरु केली आहे. तसेच भिवंडीतील खोणी खाडीपार ग्रामपंचायत परिसरात एनआयएकडून ही कारवाई झाली. भिवंडीत वर्षभरात झालेली ही तिसरी कारवाई आहे. अमरावतीच्या छाया नगरात एनआयएची टीम बुधवारी रात्री पोहचली होती. एनआयएच्या टीमने एका ३५ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर त्या तरुणाला घेऊन एनआयएची टीम पोलीस ठाण्यात आली. अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये या युवकाची सध्या चौकशी सुरू आहे. हा तरुण पाकिस्तानमधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा एनआयएला संशय आहे. या तरुणासंदर्भात अधिक माहिती मिळाली नाहीत.

एनआयएला अमरावतीमधील एक तरुण पाकिस्तानच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर एनआयएचे पथकाने बुधवारी थेट अमरावती पोहचले. त्या तरुणाला रात्री १२ वाजता ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरु केली. तो तरुण पाकिस्तानी संघटनेच्या कसा संपर्कात आला? अमरावती किंवा भारतात त्यांच्यासोबत कोण आहे? तो कोणत्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला का? या बाबत चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडून करण्यात येत आहे. अमरावतीप्रमाणे एनआयएची टीम भिवंडी शहरालगतच्या खोणी खाडीपार ग्रामपंचायत परिसरात पोहचली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास आलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकाने एकास ताब्यात घेतले आहे. कामरान अन्सारी ४५ असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो पाकिस्तानमधील एका संघटनेशी संपर्कात असल्याचा संशय आहे. भिवंडीत वर्षभरात एनआयएने केलेली ही तिसरी कारवाई आहे. यासंदर्भातील अधिक माहिती स्थानिक पोलिसांकडे नाही. भिवंडीत यापूर्वी एनआयएने छापे टाकले होते. मागील वर्षी डिसेंबर महिन्यातच भिवंडीच्या पडघा गावात एनआयएने मोठी कारवाई केली होती. या ठिकाणावर ७ ते ८ जणांना ताब्यात घेतले होते. पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना अटक करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon