शेअर बाजारात गुंतवणुकीच्या बहाण्याने ४३ लाखांची फसवणूक, वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
वाकड – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवून एका वृद्ध व्यक्तीची ४३ लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना बालाजी युनिव्हर्सिटी ताथवडे येथे घडली. विवेक वसंतराव चांदुरकर (वय ६१, रा. आंबेगाव, पुणे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ९५५२९४३९६४ या क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी चांदुरकर यांना व्हाट्सअप द्वारे संपर्क केला. आयआयएफएल इन्स्टिट्यूशनल कंपनीच्या मार्फत शेअर मार्केटमध्ये आयपीओ व ब्लॉक ट्रेडिंग करण्याबाबत सांगितले. त्यांना एक लिंक पाठवून लिंकवर वैयक्तिक माहिती भरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवले. त्यानंतर चांदुरकर यांच्याकडून ४३ लाख ७९ हजार ९०० रुपये घेत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.