पुण्यातील धायरी भागात पूर्व वैमनस्यातून दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी गुन्हे दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे हळूहळू गुन्हेगारीकडे सरकत चालले असल्याचे दिसून येत आहे. पुण्यात दररोज गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अशीच एक सिंहगड रस्त्यावर घडली आहे. वैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरुन दाेन गटांविरुद्ध सिंहगड रस्ता (नांदेड सिटी) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत स्वप्नील संतोष खिरीड (वय २०, रा. लायगुडे वस्ती, अंबाईदरा, धायरी) याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अविनाश शिळीमकर, कुणाल जाधव, आदित्य म्हस्के, अथर्व दोडके, अथर्व शिंदे यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिळीमकर, म्हस्के, दोडके यांना अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी खिरीड याच्या घरी आले. तुझा भाऊ कोठे आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपींनी खिरीड याच्यावर कोयते उगारले. त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. एका महिलेला शिवीगाळ करुन तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली, असे खिरीडने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपी शिळीमकर याने परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अमित कदम, ओंकार भाेसले यांच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिळीमकर आणि त्याचे मित्र धायरीतील पोकळे वस्ती परिसरात थांबले होते. आरोपी कदम, भोसले आणि साथीदार तेथे आले. त्यांनी शिळीमकर याच्या अंगावर मोटार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद शिळीमकर याने दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव आणि उपनिरीक्षक बुनगे तपास करत आहेत