नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन, ४ आठवड्याची झुंज अयशस्वी
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन झालंय. मागील ४ आठवड्यांपेक्षा जास्त काळ समीर खान यांची मृत्यूची झुंज सुरु होती. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. समीर खान हे नवाब मलिक यांची मोठी मुलगी निलोफर मलिक हिचे पती होते. समीर खान यांचा १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अपघात झाला होता. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर व त्यांचे पती समीर खान क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये नियमित आरोग्य तपासणीसाठी गेले होते. त्यानंतर तपासणी झाल्यानंतर घरी येण्यासाठी ते कारची वाट बघत उभे होते. त्यावेळी त्यांच्याच ड्रायव्हरने त्यांच्यावर गाडी घातली होती. कार चालक अबुल मोहम्मद सोफ अन्सारी हे गाडी घेऊन आले असता त्यांचा पाय अचानक कारच्या एक्सलेटरवर पाय ठेवला गेल्याने थार कार थेट समीर खान यांच्या अंगावर गेली. यात ते गंभीर जखमीही झाले. त्यांना लगेच क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूला मार लागला होता.
नवाब मलिक म्हणाले, माझे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. अल्लाह त्यांना स्वर्गात सर्वोच्च स्थान देवो. समीर यांच्या जाण्याने आमच्या परिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवसांचे माझे सर्व नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत.