भरधाव वाहनानं ३ दुचाकींना चिरडले; अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यु, गावावर शोककळा
योगेश पांडे/वार्ताहर
नंदुरबार – राज्यात रस्ते वाहन अपघाताचे सत्र सुरूच आहे. नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद गावाजवळ भीषण अपघात घडला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. भरधाव वेगात असणाऱ्या बोलेरो वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असेल्या ३ दुचाकींना चिरडले. ऐन दिवाळीत कुटुंबावर शोककळा पसरली. २ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातात चार चाकी वाहनांसह मोटरसायकलींचा जागीच चुरडा झाला. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपळोद गावाजवळ हा अपघात घडला. एक मोटारसायकल नादुरुस्त होती. अंधार असल्याने दुचाकी दुरूस्तीसाठी इतर दोन दुचाकी घटनास्थळी आल्या होत्या. त्यावेळी नंदुरबारकडून धानोराकडे एक बोलेरो भरधाव वेगात जात होती. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या तीन दुचाकीला चिरडले. त्यात 5 जणांचा मृत्यू झाला.
या अपघातात योगेश कालूसिंग नाईक, राहुल धर्मेंद्र वळवी, अनिल सोन्या मोरे, चेतन सुनील नाईक, श्रीकृष्ण लालसिंग ठाकरे यांचा मृत्यू झाला. तीन दुचाकींना ठोकरल्यानंतर बोलेरो गाडीही उलटली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऐन दिवाळीतच या गावावर शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली. त्यांच्या आक्रोशाने अनेकांची मनं हेलावली.