विशेष विमानाने ‘एबी फॉर्म’ पाठवणं महायुतीला भोवणार?
निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश; एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमकडे विचारणा, खर्चाच्या तरतुदीसाठी प्रशासनाची धावपळ
योगेश पांडे/वार्ताहर
नाशिक – नाशिक जिल्ह्यातील विधानसभेच्या तीन जागांसाठी खास विमानाने आलेल्या ‘एबी फॉर्म’ची वार्ता सर्वदूर पसरल्यानंतर निवडणूक आयोगानेही त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आयोगाकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमकडे विचारणा केल्याची प्राथमिक माहिती आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, जिल्ह्यात पक्षांतर्गत बंडखोरीसह मैत्रीपूर्ण लढतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या अर्ध्या तासात ‘एबी फॉर्म’बाबत नाट्यमय घडामोडी घडल्या. देवळाली आणि दिंडोरीतील प्रत्येकी एका उमेदवारासाठी खास विमानाने ‘एबी फॉर्म’ पाठविण्यात आले. अंतिम काही मिनिटांत ते दाखल झाल्याने उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. या धावपळीमध्ये इगतपुरीसाठीही एक ‘एबी फॉर्म’ दहा मिनिटे उशिराने आल्याने तो दाखल होऊ शकला नाही. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक आयोगाने त्याची दखल घेऊन जिल्हा निवडणूक शाखेला त्याबाबत विचारणा केली आहे. अर्ज देण्यासाठी विमान कोणी आणले, त्यामध्ये कोण होते, कोणत्या उमेदवारांकरिता हे फॉर्म मागविण्यात आले व त्यासाठी किती खर्च आला, अशी विचारणा स्थानिक प्रशासनाकडे झाल्याचे समजते. जिल्हा प्रशासनाने या चौकशीला सुरुवात केली असून, एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाकडे त्याबाबत विचारणा केली आहे. याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
विमान प्रवासाचा खर्च उमेदवारांच्या फॉर्मसाठी झाल्याचे स्पष्ट झाले, तर त्याचा खर्च उमेदवाराच्या खात्यात टाकला जाईल. अन्यथा हा खर्च पक्षाच्या खात्यामध्ये टाकला जाऊ शकतो. पक्षाच्या खर्चाला मर्यादा नाहीत. मात्र, हा खर्च उमेदवाराच्या खात्यात पडल्यास स्वतंत्र विमान आणल्याचा खर्च मोठा असणार आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांच्या पुढील खर्चाबाबत मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.