धक्कदायक ! नालासोपाऱ्यात ७ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; एका आरोपीला अटक तर दूसरा अल्पवयीन आरोपी फरार
योगेश पांडे/वार्ताहर
वसई – नालासोपारा येथे ७ वर्षांच्या चिमुकलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अल्पवयीन आरोपी फरार झाला आहे. नालासोपार्यात सामूहिक लैंगिक अत्याचाराची महिन्याभरात ही ७ वी घटना आहे. पीडित मुलगी ७ वर्षांची आहे. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास आरोपी शुभम वर्मा – ३० आणि १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने तिला धानिवबाग येथील एका गल्लीतील गाळ्यात नेले. वर्मा याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला तर अल्पवयीन मुलाने त्या प्रसंगाचे आपल्या मोबाईल मध्ये चित्रण केले. हा प्रकार पीडित मुलीने घरी येऊन आपल्या आईला सांगितला. आईने तात्काळ पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पेल्हार पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधातल भारतीय न्या संहितेच्या कलम ६५ (२), ७७ तसेच बालकांचे लैगिक अत्याचापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आम्ही एका आऱोपीला अटक केली आहे तर दुसर्या फरार आरोपीचा शोध घेत आहोत, अशी माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली.