लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराकडून प्रेयसीची हत्या; प्रेयसीच्या घरासमोर मृतदेह रिक्षात ठेवून प्रियकर फरार
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – पिंपरी- चिंचवडमध्ये प्रेयसीचा गळा आवळून मृतदेह तरुणीच्या आईच्या घरासमोर रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान घडली आहे. अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली. शिवानी सुपेकर असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. शिवानी आणि संशयित प्रियकर विनायक आवळे गेल्या दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेली शिवानी गेल्या एक- दोन वर्षांपासून विनायक आवळे सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. मंगळवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ वाद झाले. याच रागातून विनायकने शिवानीचा गळा आवळून हत्या केली. मग, मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावला.बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. आरोपी प्रियकर रिक्षा चालक असून तो फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे.