मद्यविक्री परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या पोलीस अधीक्षकाला सीआयडीने केली अटक
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – सीआयडीने आपल्याच विभागात फरार असलेल्या अतिरिक्त पोलीस अधिक्षकाला १ कोटीच्या ५ लाख रुपये रक्कमेच्या फसवणूक प्रकरणी अटक केली आहे. महाबळेश्वर येथील हॉटेल व्यावसायिकाला मद्यविक्री परवाना मिळवून देण्यासाठी अडीच कोटींची मागणी करुन १ कोटी ५ लाख रुपये घेणार्या सीआयडीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकाला सीआयडीने कारवाई केली आहे. श्रीकांत नामदेवराव कोल्हापूरे असे अटक केलेल्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर येथील हेमंत बाळकृष्ण साळवी यांचे मेघदूत हॉटेल आहे. या हॉटेलसाठी मद्यविक्री परवाना मिळवून देतो, असे सांगून श्रीकांत कोल्हापूरे याने त्याचे मित्र हनुमंत मुंडे, अभिमन्यू रामदास देडगे, बाळु बाबासाहेब पुरी यांनी हॉटेलचालकाकडे २ कोटी ५० लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी १ कोटी ५ लाख रुपये घेतले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे हॉटेल मालकाच्या लक्षात आले. त्यांनी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस महासंचालकांकडे तक्रार अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन संशयित हनुमंत विष्णुदास मुंडे, अभिमन्यू रामदास देडगे व बाळु बाबासाहेब पुरी यांना सीआयडीने अटक केली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीकांत कोल्हापूरे हा फरार झाला होता. सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक गणेश माळी, पोलीस निरीक्षक वर्षा कावडे, पोलीस अंमलदार विजय कुंभार,
निवृत्ती पाडेकर, जमीर मुल्ला व स्वप्नील जाधव यांच्या पथकाने श्रीकांत कोल्हापूरे याला ठाणे येथून अटक केली. त्याला वाई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले तपास करीत आहेत.