गाडीचे सीट फाडल्याने कुत्र्यांना मारहाण, पिता-पुत्रांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुणे विविध घटनांनी सध्या प्रकाशझोतात आहे. विद्येचे माहेरघर गुन्हेगारीचे शहर म्हणून ओळखले जात आहे. अशीच एक घटना स्वारगेट परिसरात घडली आहे. सोसायटीमध्ये पार्क केलेल्या गाडीचे सीटकव्हर फाडल्याने चिडलेल्या पितापुत्राने कुत्री व तिच्या पिल्लांना काठीने मारहाण केली. हा प्रकार एका प्राणीप्रेमीला कळाल्यावर त्याने पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी पितापुत्रांवर गुन्हा दाखल केला आहे. भरतकुमार धनराज गांधी आणि हर्षद भरतकुमार गांधी (रा. आदिनाथ सोसायटी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अॅड.अमित शहा यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शहा यांना एकाचा फोन आला. भरतकुमार गांधी हे भटक्या कुत्र्यांना मारत आहेत. शहा यांनी भरतकुमार यांना फोन करुन विचारणा केली. तेव्हा त्यांनी या कुत्र्यांनी सर्व गाड्यांची सीट फाडली. इथं लोकांचे नुकसान होते आहे, असे ते म्हणाले, त्यावर फिर्यादी यांनी मी नुकसान भरुन देतो, असे सांगून ते खाली आले. तेव्हा भरतकुमार गांधी यांच्या हातात काठी होती ते व त्यांचा मुलगा काठीने कुत्र्यांना मारत होते. शहा यांनी तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून स्वारगेट पोलीस अधिक तपास करीत आहेत