बदलापूरहून आलेली बातमी धक्कादायक, निषेध करावी अशीच आहे..
दत्तात्रय कराळे / प्रतिनिधी
बदलापूर – अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर बदलापूरमध्ये जनतेच्या संतापाचा कडेलोट झाला.. लोक रस्त्यावर उतरले .. या जनआंदोलनाची बातमी कव्हर करणे पत्रकारांचे काम होतं…
ते त्यांनी केलं..
तथापि आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठी शाळा व्यवस्थापन, पोलीस प्रशासन व शासन यांच्या संगनमताने आता वेगळीच कारस्थानी खेळी खेळली जात आहे. वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाच दोषी ठरवून आता त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याची मोहिम बदलापूर पोलिसांनी सुरू केली आहे..
श्रध्दा ठोंबरे या महिला पत्रकारावर लोकांना भडकवल्याचा आरोप ठेवत चक्क त्यांच्यावरच गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस ठाण्यात हजर होण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.. रेल्वे पोलिसांनी देखील पत्रकारांना टार्गेट करायला सुरूवात केली आहे..
“चालणं कुठं”नावाचा वाक्प्रचार प्रचलीत आहे..
म्हणजे बडयां धेंडांना हात लावायची हिंमत नाही, म्हणून दुबळ्यांना ठोकायचे, असा या म्हणीचा अर्थ.. जणू काही
बदलापूर पोलिसांचं वर्तन असंच आहे..
वामन म्हात्रे यांचा अटकपूर्वजामीन अर्ज कल्याण न्यायालयाने दोनदा, मुंबई उच्च न्यायालयाने एकदा फेटाळूनही वामन म्हात्रे यांना पोलीस हात लावत नाहीत, ज्या शाळेत मुलीवर अत्याचार झाले, त्या शाळेच्या व्यवस्थापनाला पोलीस पाठीशी घालत आहेत..
मात्र वार्तांकनाचं आपलं कर्तव्य पार पाडणाऱ्या पत्रकारांवर गुन्हे दाखल करून त्याच्या अटकेची तजवीज केली जात आहे..
पोलिसांची हीच मर्दुमकी आहे ?
बदलापुरातील पोलिसांची ही मुजोरी संतापजनक आणि निषेधार्थ आहे..
किंबहुना त्यासाठीच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मिडिया परिषद पोलिसांच्या या मनमानीचा तीव्र निषेध करीत आहेत…!