यूट्यूबवरुन हॅन्डल लॉक तोडायचे शिकून तब्बल १८ दुचाकी चोरणाऱ्या युवकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या, एकूण १६ गुन्हे उघडकीस
योगेश पांडे / वार्ताहर
पिंपरी – भांडण झाल्याने घर सोडल्यानंतर दुचाकी कशी चालू करायची, हॅन्डल लॉक कसे तोडायचे हे यूट्यूबवररुन पाहून महामार्गालगतच्या दुचाकी चोरणा-याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून आठ लाख ९० हजार रुपयांच्या १८ दुचाकी जप्त केल्या, तर वाहनचोरीचे १६ गुन्हे उघडकीस आले आहेत. अभिषेक मल्लाप्पा हावळेकर (२१), असे अटक केलेल्या दुचाकी चोराचे नाव आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाणेर-म्हाळुंगे येथील एका गृहनिर्माण सोसायटीतील एक बुलेट आणि दुचाकी चोरीला गेली होती. त्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील ८० सीसीटीव्ही कॅमे-यांची तपासणी केली. त्यानुसार त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. अभिषेक याच्यासह दुचाकी चोरल्याची कबुली अल्पवयीन साथीदाराने दिली.
अभिषेक घरी भांडण झाले म्हणून पुण्याला आला होता. त्याने यूट्यूबवररुन दुचाकी कशी चालू करायची, हॅन्डल लॉक कसे तोडायचे हे पाहिले होते. ते पाहून दुचाकींची चोरी करत होता. ‘सीसीटीव्ही’ कॅमे-यांमध्ये दिसू नये यासाठी तो महामार्गालगतच्या दुचाकींची चोरी करत होता. पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा येथून दुचाकी चोरल्याचे कबुली त्याने दिली.