मानखुर्दच्या महाराष्ट्रनगरमध्ये गोणीत सापडलेल्या ‘त्या’ महिलेच्या मृत्यूचा गुंता सोडवण्यात पोलिसांना यश
कौंटुबिक कलहातून महिलेची हत्या, पतीसह सासरच्या पाच जणांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मानखुर्दच्या महाराष्ट्रनगरमध्ये शुक्रवारी गोणीत सापडलेल्या महिलेच्या मृत्यूचा गुंता सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे. रेश्मा जयस्वाल असे तिचे नाव असून कौटुंबिक वादातून तिची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिच्या पतीसह दीर, मेव्हुणा, नणंद आणि सासूला अटक केली आहे. महाराष्ट्रनगर परिसरात ‘मेट्रो २ बी’ या मार्गाच्या कारशेडचे काम सुरू आहे. याठिकाणी खोदकाम करण्यात आल्याने एका मातीच्या ढिगाऱ्याआड शुक्रवारी काही कामगारांना दुर्गंधी येत होती. त्यांनी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एक गोणी आढळली. त्यामध्ये महिलेचा मृतदेह कोंबण्यात आला होता. कामगारांनी तत्काळ याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार ट्रॉम्बे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासासाठी १० पथके तयार केली. अंगावरील वस्त्र, बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी यावरून तपास करीत मृत महिलेची ओळख पटवण्यात आली. तिचे नाव रेश्मा कन्हैयालाल जयस्वाल असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली. माहेरी आणि सासरच्या व्यक्तींची चौकशी केली असता, तिला सासरच्या मंडळींचा त्रास असल्याचे समोर आले. त्यानुसार चौकशीचा फास आवळला असता, कौटुंबिक कलहातून सासरच्यांनीच तिची हत्या करून मृतदेह गोणीत टाकल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी याप्रकरणी रेश्माचा पती कन्हैयालाल भैयालाल जयस्वाल ऊर्फ लाला याच्यासह अशोक भैयालाल जयस्वाल ऊर्फ चिंटू, रवी ऊर्फ प्रेमकुमार रामयालाल श्रीवास्तव, मुन्नी रामयालाल श्रीवास्तव आणि रेश्मा रामयालाल श्रीवास्तव यांना अटक केली