बदलापूर शाळेबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा धक्कादायक खुलासा; शाळेतलं गेल्या १५ दिवसांतलं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग गायब
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – बदलापूरच्या शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी धक्कादायक असे खुलासे केले आहेत. शाळेतलं गेल्या १५ दिवसांतलं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग गायब असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिक्षण विभागाच्या चौकशी समितीने याबाबत माहिती दिलीय. शाळेच्या पदाधिकाऱ्यांना या बाबत माहिती असतानाही कारवाई केली नसल्याचं केसरकर म्हणाले. प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही लावणं बंधनकारक आहे. त्यांचे १५ दिवसांचे रेकॉर्डिंग गायब आहे. त्याची चौकशी सध्या सुरू आहे. शाळेत मदतकक्ष सुरू करणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं. शिक्षण विभागाच्या चौकशी समितीत १५ दिवसांच्या सीसीटीव्ही फूटेजबाबत धक्कादायक माहिती समोर आली. पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट लवकरच घेणार आहे. तसंच या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेणार आहे. तिच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत असल्याची घोषणा दीपक केसरकर यांनी केली.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी बोलताना मंत्री केसरकर म्हणाले की, आम्ही सध्या वस्तुस्थिती तपासत आहे आणि पोलिसांना पुढच्या तपासासाठी देत आहे. अत्याचाराच्या घटनेतील मुलीला १० लाखांची मदत करण्यात येईल. तर जिच्यावर अत्याचार झाला तिला तीन लाख रुपयांची मदत केली जाईल. दोघींच्याही शिक्षणाची जबाबदारी आम्ही उचलणार आहोत. त्यांना लागणारी आर्थिक मदत दर महिन्याला चेकच्या स्वरुपात दिली जाणार असल्याची माहिती दिलीय. बदलापूर शाळेतील प्रकरणावर बोलताना दिपक केसरकर म्हणाले की, शाळेत घडलेल्या प्रकाराबाबत समिती नेमली होती. अहवालात समोर आलेल्या माहितीवरून आम्ही निर्णय घेतलाय. मुलींना वॉशरुमला नेण्यासाठी कामिनी गायकर आणि निर्मला भुरे दोन सेविका होत्या. त्या चौकशीला उपस्थित राहिल्या नाही. त्यावरून त्यांना काही बोलायचं नसल्याचं गृहीत धरून कारवाई केली जाईल. दोघीही हजर असत्या तर हे घडलं नसतं. त्यामुळे त्यांनाही सहआरोपी करण्याच्या सूचना दिल्याचं केसरकर म्हणाले.