भिवंडीत गांजा विकणाऱ्या पानटपरी चलकाला शांतिनगर पोलीसांनी केली अटक; रिक्षासह तीन लाख ९० हजार रुपयांचा माल जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात गांजा ओढणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.भिवंडी गुन्हे शाखा आणि शांतीनगर पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत दोन तस्करांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून ४ लाख ९ हजार ५६० रुपये किंमतीचा ११.३७८ किलो गांजा जप्त केला आहे. गेल्या आठवड्यात गुजरात एटीएसने नदीनाका येथील एका निवासी इमारतीवर छापा टाकून ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश केला होता. एटीएसच्या या कारवाईत ८०० कोटी रुपयांचे एमडी ड्रग जप्त करण्यात आले. मुंबईत राहणाऱ्या दोन सख्या भावांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी गांजा आणि अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. भिवंडीच्या शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण भिवंडी रोडवर असलेल्या भादवड पाईपलाईन ब्लॉक, सार्वजनिक शौचालयाजवळ, पान स्टॉलवरून छुप्या पद्धतीने गांजा विक्री करणाऱ्या पानटपरी चालक रणजितकुमार चौहान याला भिवंडी गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून १९६५० रुपये किंमतीचा ८९८ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. त्याच ठिकाणी बुधवारी दुपारी चारच्या सुमारास रिक्षाचालक सलीम इब्राहिम खान शहरातील गांजा विकण्यासाठी आला होता. त्याला शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. झडतीदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून १०. ४३० किलो गांजा जप्त केला. शांतीनगर पोलिसांनी रिक्षासह तीन लाख ९० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.