अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरीची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडली; कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
अकोला– राष्ट्रवादीचे आमदार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय अमोल मिटकरी यांच्यावर आज अकोल्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. काल पुण्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्या टिकेला उत्तर देताना आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हटले होते. यावरूनच संतप्त कार्यकर्त्यांनी आज अमोल मिटकरी यांच्यावर आणि गाडीवर हल्ला केला आहे.
आमदार अमोल मिटकरी दुपारी लोकांना भेटण्यासाठी अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर आले असता त्यावेळी मनसेची एक आढावा बैठक विश्रामगृहात सुरू होती. मिटकरी विश्रामगृहावर असल्याचे समजतात मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या खोलीकडे धाव घेत त्यांच्याविरोधात प्रचंड नारेबाजी केली. यावेळी मिटकरींनी आपल्या खोलीतील अँटीचेंबरचा दरवाजा लावल्यामुळे मोठा अनर्थ टळला. यासंदर्भात अकोल्यातील सिविल लाईन पोलिसात हल्लेखोर मनसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला करणारे सर्व मनसैनिक सध्या फरार आहेत. हल्ल्यानंतर आपल्याला जीवे मारण्याचा मनसे कार्यकर्त्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. या तोडफोड प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे सिव्हील लाईन पोलिसांनी दाखल केले आहेत. आरोपींमध्ये मनसे सरचिटणीस करर्णबाळा दुनबळे, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, राजेश काळे, सौरभ भगत, महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे, बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष सचिन गालट यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.