पुण्यात फ्लॅटचा ताबा वेळेत न देता ३ कोटींची फसवणूक, चार बिल्डरवर ‘मोफा’ अंतर्गत गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुण्यातील एका विकासकाने ग्राहकाकडून फ्लॅटसाठी कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. फ्लॅटचा ताबा वेळेत न देता तसेच परस्पर फायनान्सकडे तारण ठेवून तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी चार बिल्डरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १६ ऑगस्ट २०१४ ते २५ ऑक्टोबर २०१६ या कालावधीत कोरेगाव पार्क येथील मार्वल बसिलो या गृहप्रकल्पात घडला आहे.
याबाबत सनी फ्रान्सीस जेकब (वय-७९ रा. हर्म्स पार्क, बंडगार्डन रोड, पुणे) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मार्वल बसिलो प्रकल्पाचे प्रमोटर्स (जमीन मालक व डेव्हलपर) विजय वासुदेव वाधवा (रा. प्लाटीना, जी ब्लॉक, बीकेसी बांद्रा, मुंबई), संजय राजकुमार छाब्रिया, नवीन अमरलाल मखिजा, विश्वजीत सुभाष झवर (रा. ज्वेल्स टॉवर्स, लेन नं. ५ कोरेगाव पार्क) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८ (४), ३ (५) सह महाराष्ट्र ओनरशिप ऍक्ट (मोफा) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मित्र शाम आसनानी व त्यांच्या मुलीने आरोपींच्या मार्वल बसिलो गृहप्रकल्पात फ्लॅट बुक केला होता. आसनानी व त्यांच्या मुलीने प्लॅटसह दोन कार पार्कंग विकत घेतले होते. त्यासाठी ३ कोटी १९ लाख २५ हजार ५०० रुपयांचा व्यवहार ठरला होता. ठरलेल्या रक्कमेपैकी आसनानी यांनी २ कोटी ९९ लाख ३५ हजार ७१९ रुपये आरटीजीएस तसेच चेक द्वारे प्रकल्पाचे प्रमोटर्स यांना दिले. आरोपींनी त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यात ही रक्कम घेतली. आरोपींनी मुदतीत फ्लॅट देण्याचे आश्वासन दिल्याने आसनानी यांनी फ्लॅट खरेदी केला होता. प्रमोटर्स यांनी हा प्रकल्प मुदतीत पुर्ण करुन देण्याचे आश्वासन दिले. मात्र, मुदतीत प्रकल्प पुर्ण केला नाही तर वार्षीक ९ टक्के दराने नुकसान भरपाई देण्याचे ठरले होते. मात्र, आरोपींनी मुदतीत प्रकल्प पुर्ण केला नाही. तसेच ठरल्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली नाही. याशिवाय शाम आसनानी व त्यांच्या मुलीच्या संमतीशिवाय फायनान्स कंपनीला फ्लॅट मॉरगेज करुन दिला तसेच आसनानी यांनी दिलेल्या पैशांचा हिशोब न देता मार्वल बसिलो प्रकल्पाचे प्रमोटर्स यांनी आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.