पत्नीचे अपहरण करून अनन्वित छळ; पती व सासूविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पिंपरी, चिंचवड – वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहित महिलेचे भरदिवसा अपहरण करून तिला ऑफिसमधून गाडीपर्यंत फरफटत नेण्यात आले. ती कुठेही पळून जाऊ नये म्हणून दोन दिवस तिला वारंवार भुलीचं इंजेक्शन देऊन गाडीतच डांबून ठेवण्यात आले.
सुमित शहाणे असं या निर्दयी पतीचे नाव आहे. मंचरमधील हे विवाहित जोडपे असून ऑगस्ट २०२३ मध्ये या दोघांचं लग्न झाले, मात्र आठवडाभरात पती सुमितने नको त्या मागण्या सुरू केल्याने पीडित महिला प्रचंड मानसिक तणावाखाली होती. यामुळे तिने नवऱ्यापासून वेगळे होत मुंबई गाठली. काही दिवस मुंबईत काम केल्यावर या महिलेने पुन्हा पिंपरी चिंचवड या ठिकाणी एक नोकरी मिळवली. याचा सुगावा सुमितला लागला अन् त्याने पत्नीच्या ऑफिसचा पत्ता शोधून काढला. १९ जूनला सुमित आई आणि चालकासोबत वाकडमध्ये आला व दुपारी साडे तीनच्या सुमारास पत्नीला फरपटत गाडीत बसवले.
प्रवासात सुमितने पत्नीला भुलीचं इंजेक्शन देऊन थेट घरी न जाता गाडीतच डांबून ठेवले. या दरम्यान ती शुद्धीवर आली की तो वारंवार भुलीच इंजेक्शन द्यायचा, असा आरोप पीडित महिलेने तक्रारीत नमूद केला आहे. २० जूनच्या दुपारी तिने सुमितला विश्वासात घेऊन, तो सांगतोय त्या कागदपत्रांवर सही करते असं म्हणाल्याने सुमितने गाडी मंचर परिसरात आणली, मात्र माझी भूल अद्याप उतरली नाही, असा बहाणा तिने केला व मंदिरातच थांबून राहिले. त्यावेळी सदर पीडित महिलेने एका तरुणाकडे मदतीची मागणी केली असता तरुणाला ही काहीतरी गडबड असल्याचे समजले, त्या तरुणाने मंचर पोलिसांना पोलिसांना मंदिरात बोलावून घेतले. पोलीस मंदिरात पोहचले आणि सदर पीडित महिलेची सुमितच्या तावडीतून सुटका झाली. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून पती, आई आणि चालकाविरुद्ध वाकड पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.