पुणे तिथे काय उणे ! जमीन मोजण्यासाठी मागितली ४ लाखांची लाच; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – देहूगाव परिसरातील जमीन मोजण्यासाठी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दौलत मधुकर गायकवाड, (वय ३५ वर्षे, भू करमापक भूमी अभिलेख कार्यालय, हवेली, येरवडा, पुणे.), योगेश्वर राजेंद्र मारणे, (वय २५ वर्षे, रा एरंडवणे, पुणे) यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अ १२ अन्वये येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमीन मोजण्यासाठी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी दौलत गायकवाड यांच्या सांगण्यावरून योगेश्वर मारणे ४ लाख रुपयांमधील ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे. याबाबतचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.