प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व आमदार बच्चू कडू यांना जीवे मारण्याची धमकीने खळबळ !
पोलीस महानगर नेटवर्क
अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आमदार बच्चू कडू यांनी स्वतः या संदर्भात जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. गोपनीय माहितीनुसार, माझ्या जिवीताला धोका आहे, असं बच्चू कडू यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत आहेत. अपघात झाल्याची कोणीतरी अफवा पसरवत आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची बच्चू कडू यांनी मागणी केली आहे. सध्या बच्चू कडू यांना पोलिसांची वाय प्लस सुरक्षा आहे. बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. बच्चू कडू हे आक्रमक आमदार म्हणून ओळखले जातात. नेहमीच ते रोखठोक, स्पष्ट भूमिका घेतात. बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.