पुण्यात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पार्लरचालकसह तीन महिला पोलिसांच्या ताब्यात
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुण्यात एकीकडे गुन्हेगारीने डोके वर काढले असून शहरात रोज नवनवीन घटना घडताना दिसत आहेत. मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याप्रकरणी मसाज पार्लरचालक पूजा दत्तात्रय जगदाळे (वय-३५, रा. धायरी, सिंहगड रस्ता) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकत वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी पार्लरचालक विरोधात गुन्हा दाखल करत तीन महिलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस हवालदार रेश्मा कंक यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात एका इमारतीत मोरया आयुर्वेद मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत मसाज पार्लरमधून तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले. महिलांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी मसाज पार्लरचालक जगदाळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष पोलिस निरीक्षक विजय कुंभार अधिक तपास करीत आहेत.