पिंपरीमध्ये रस्त्यात उभे राहून अश्लील हावभाव करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पिंपरी – देवाची आळंदी येथील चाकण-आळंदी रोडवरील कुरुळी परिसरात सार्वजनिक रस्त्यावर उभे राहून शरीरविक्री व्यवसायासाठी एक महिला अश्लील हावभाव करत असल्याची माहीती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार आळंदी फाटा येथील एका लॉजच्या लगत असलेल्या रोडवर कारवाई करत एका महिलेला ताब्यात घेत तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
चाकण-आळंदी रोडवरील शिवसाई लॉज लगत असलेल्या रोडवर एक महिला रस्त्यात थांबून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना पाहून अश्लील हावभाव करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एक महिला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अश्लील हावभाव करून वेश्याव्यवसायासाठी खुणावीत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला ताब्यात घेतले. महिलेने अश्लील हावभाव करुन अश्लील शब्द उच्चारुन सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करुन सार्वजनिक शिष्टाचाराच्या सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य केले. याबाबत पोलीस कर्मचारी गणेश कारोटे यांनी चाकण पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. यावरुन पोलिसांनी महिलेवर अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोरकर करत आहेत.