कल्याण लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला भाजपच्या कार्यकर्त्याकडून धमकी,मानपाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार
योगेश पांडे /वार्ताहर
डोंबिवली – कल्याण लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असलेल्या शिवा अय्यर या उमेदवाराला भाजपच्या एका कार्यकर्त्याने धमकी दिली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात उमेदवार अय्यर यांनी लेखी तक्रार अर्ज दिला आहे. मागील अनेक वर्ष शिवा अय्यर हे कल्याण लोकसभा निवडणूक लढवितात. ते शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असतात. यावेळीही अय्यर यांनी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. ते डोंबिवली पूर्वेतील सागाव भागात राहतात. उमेदवार असल्याने शिवा अय्यर आपल्या कार्यकर्त्यांसह विविध भागात प्रचारासाठी जातात. डोंबिवलीत अशाच एका भागात प्रचारासाठी गेले असताना शिवा अय्यर यांना भाजपच्या एका कार्यकर्त्याने अय्यर यांना मोबाईलवर संपर्क साधला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदूंवर अजिबात टीका करायची नाही, अशी धमकी दिली.
या धमकीमुळे आपल्या जीविताला धोका निर्माण झाल्याने शिवा अय्यर यांनी तातडीने मानपाडा पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या कार्यकर्त्याच्या विरुध्द लेखी तक्रार केली आहे. पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतली आहे.या धमकीमुळे आपणास आता प्रचारासाठी बाहेर पडणे धोक्याचे वाटू लागले आहे. त्यामुळे आपणास पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी अय्यर यांनी मानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. उमेदवार अय्यर यांना धमकी आल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र आहे. मग त्यांनी कोणाच्या विरोधात बोलायचे नाही का, असे प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित केले जात आहेत. धमकी देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी अय्यर समर्थकांनी केली आहे.