नाशिकमध्ये पेट्रोलियम कंपनीचे वेंडर रजिस्ट्रेशन मिळाल्याची बतावणी; १२ लाखांना
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, झटपट दामदुप्पट परतावा मिळवा असे आमिष दाखवत डॉक्टर, इंजिनिअर यांना ठकविल्याची अनेक उदाहरणे समोर येत असताना अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली आहे. भारत पेट्रोलियम कंपनीच्या नावाने खराखुरा वाटावा अशा मेल आयडीवरून मेल करून सायबर भामट्याने शहरातील एका उद्योजकाला भारत पेट्रोलियम कंपनीसाठी वेंडर म्हणून टेंडरचे आमिष दाखवून तब्बल १२ लाख ४९ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिसात अज्ञात सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय शांताराम सांगळे (रा. पाटील लेन, कॉलेज रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची रोहन एनर्जी सोल्युशन्स या नावाची कंपनी आहे. सांगळे यांच्या कंपनीच्या मेल आयडीवर भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या नावाने मेल आला. या मेलसोबतच शर्मा एन्टरप्रायझेसच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खातेक्रमांकासह आयएफसी कोडही नमूद करण्यात आला होता. या मेलमध्ये भारत पेट्रोलियन कंपनीच्या वेंडर रजीस्ट्रेशन करून २०२४-२५ या वर्षासाठी टेंडर दिले जाणार असल्याचे म्हटले होते. त्यासाठी ठराविक रक्कम संबंधित बँकेच्या खात्यावर जमा करण्याची सूचना देण्यात आलेली होती. त्यानुसार, संजय सांगळे यांनी टेंडर मिळणार या दृष्टीने पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यावर पैसे जमा केले. प्रत्यक्षात संबंधित भारत पेट्रोलियम कंपनीच्या नावाने बनावट मेल आयडी बनवून सायबर भामट्यांनीच सांगळे यांना टेंडरचे आमिष दाखवून तब्बल १२ लाख ४९ हजार २५५ रुपयांना गंडा घातल्याने निदर्शनास आले.
याप्रकरणी सांगळे यांनी शहर सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार आयटी ॲक्टअन्वये फसवणुकीचा गुन्हा बनावट मेल आयडीधारक व बँक खातेधारकाविरोधात दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे करीत आहेत.