नाशकात १० हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – श्रमिकनगर येथे हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी इमारती निधीच्या नावाखाली १० हजारांची लाच स्वीकारताना शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने श्रमिकनगरमधील श्री शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयात सदरची कारवाई शनिवारी (ता. ११) दुपारी केली. सुभाषचंद्र कौशलप्रसाद मिश्रा (५६), दिनेशकुमार जमुनाप्रसाद पांडे (५७) असे श्री शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयाच्या लाचखोर मुख्याध्यापक व उपशिक्षकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांची दोन मुले महानगरपालिका शाळा सातपूर नाशिक येथे मराठी माध्यमात इयत्ता ७ वी मध्ये शिकत आहेत.परंतु तक्रारदार हे मूळचे बिहार येथील राहणारे असुन हिंदी भाषिक आहेत. तेंव्हा त्यांच्या मुलांसाठी मराठी माध्यमात शिकण्यास अडचण येत असल्याने त्यांना शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय, श्रमिकनगर, सातपूर, नाशिक या शासन अनुदानित शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी २९ एप्रिल रोजी मुख्याध्यापक मिश्रा व उप शिक्षक पांडे यांना भेटुन प्रवेश देण्याबाबत विनंती केली. त्यावेळी मुख्याध्यापक मिश्रा व उपशिक्षक पांडे यांनी तक्रारदाराच्या दोन मुलांसाठी प्रत्येकी ८ हजार अशी सोळा हजार रुपयांची इमारत निधीच्या नावाखाली लाचेची मागणी केली होती व त्याची कोणतीही पावती मिळणार नसल्याचे सांगितले होते. तक्रारदार पुन्हा त्यांचे मुलांचे शाळा प्रवेशासाठी मुख्याध्यापक मिश्रा व उप शिक्षक पांडे यांना शाळेत भेटले असता त्यांनी १६ हजार रुपये लाचेची इमारत निधीच्या नावाखाली मागणी करून त्याची कोणत्याही प्रकारची रिसीट /पावती देण्यास नकार देऊन २६ हजार रुपयांपैकी १० हजार रुपये पहिला हप्ता म्हणुन उप शिक्षक दिनेशकुमार पांडे यांनी स्वीकारला. ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक विश्वजीत जाधव, पोलीस हवालदार प्रणय इंगळे, सुनिल पवार, सचिन गोसावी, पोलीस नाईक .दिपक पवार यांनी केली.