अबब ! ६५ घरफोडी करणाऱ्या चोरास बेड्या; माणिकपूर पोलिसांची कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
वसई – वसई विरारसह मुंबई आणि ठाणे परिसरात चोर्या करणार्या एका चोरास माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. या चोराने तब्बल ६५ घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या काही दिवसांपासून वसई विरार शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. वसईच्या शास्त्रीनगर येथील एका घरफोडीचा तपास माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक करत होते. वसई येथील शास्त्रीनगरच्या सिल्व्हर सॅन्ड सोसायटीत राहणाऱ्या माधवराव वाडीकर (वय ५०) यांच्या घरी १५ एप्रिलला दुपारी घरफोडी झाली आहे. चोरट्याने घरातून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी कुठल्याही प्रकारचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसताना आजूबाजूच्या सोसायटीचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आरोपीचा मागोवा घेऊन आरोपीचे वर्णन प्राप्त करून आतिष साखरकर (वय ३६) याला वसईतून ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीची चौकशी केल्यावर त्याने बोरिवली व विलेपार्ले परिसरात अशा प्रकारे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याने ६ गुन्ह्यांची उकल करून त्याच्याकडून ११ लाख ४४ हजार ५५० रुपयांचे २२८ ग्रॅम सोने, ३ मोबाइल फोन, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १२ लाख २२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने, पोलीस निरीक्षक संतोष चौधरी (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, शैलेश पाटील, शामेश चंदनशिवे, धनंजय चौदरी, गोविंद लवटे आदींच्या पथकाने या चोराला पकडण्यात यश मिळवले.