अंधेरी पंपहाऊस परिसरात भीषण अग्नितांडव; वाइन शॉप जळून खाक, जिवितहानी नाही
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील पंप हाऊस परिसरात मोठी आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. पंप हाऊस परिसरात असलेल्या एका दारू दुकानाला ही आग लागली. या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नसून दारु दुकान जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील पंप हाऊस परिसरात मोठी आग लागल्याची दुर्घटना घडली. गुरुवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास बंद असलेल्या दारु दुकानात ही आग लागली. दारूत असलेल्या अल्कोहोलमुळे आग अधिक पसरू लागली. यावेळी गस्तीवर असलेल्या विवेक लोबे या पोलीस शिपायाच्या लक्षात येताच ताबडतोब अग्निशमन दलाला फोन करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले.
वाईन शॉपच्या आजूबाजूला झोपडपट्टी असल्यामुळे अदानी इलेक्ट्रिसिटीकडून त्वरित या ठिकाणी चा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवून ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अजून स्पष्ट झाले नाही. या आगीमध्ये दुकानातील माल जळून खाक झाला.