पुणे तिथे काय उणे ! भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकावर ब्लेडने वार, तरुणीसह तिघांना अटक
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुण्यात दररोज गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. सांस्कृतिक पुणे गुन्हेगारीकडे वळतंय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. शहरात भाडे नाकारल्याच्या रागातून तिन जणांनी एका रिक्षाचालकावर ब्लेडने वार करुन त्याला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. सदर प्रकार मंगळवारी (दि.३० एप्रिल) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास संविधान चौकातील काकडे मैदानाच्या फुटपाथवर घडला आहे. याप्रकरणी एका तरुणीसह तीन जणांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत कुणाल बाळू कदम (वय-३६ रा. कृष्णानगर, महंमदवाडी, पुणे) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अजर बादशाह शेख (वय-३२ रा. गणेश अपार्टमेंट, केशवनगर, कोंढवा), अक्षय लक्ष्मण पवार (वय-२०, रा. काकडे मैदान, संविधान चौक, वानवडी), आरती सनी जगताप (वय-२९ रा. संविधान चौक सर्कल, वानवडी) यांच्यावर भा.द.वि कलम ३२६, ३२३, ३४ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचा चुलत भाऊ त्याची रिक्षा (एमएच १२ व्हि.बी. ४७२१) घेऊन राहत्या घरी जात होता. संविधान चौकातील काकडे मैदानाच्या जवळ असलेल्या फुटपाथवर०१ थांबलेल्या आरोपींनी रिक्षाला हात दाखवला. आरोपींनी फिर्यादी याच्या भावाकडे मुंढवा येथे जायचे आहे असे सांगितले. मात्र, त्याने मुंढवा येथे जाण्यास नकार दिला. याचा राग आल्याने अजर शेख याने त्याच्याजवळ असलेल्या ब्लेडने फिर्यादी यांच्या भावाच्या पोटावर वार करुन जखमी केले. तर इतर आरोपींनी त्याला पकडून हाताने मारहाण करुन जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. कुणाल कदम यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.