येवल्यात लाच घेतांना विद्युत वितरण कंपनीचा कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
नाशिक – नवीन वीज मीटर बसविण्यासाठी घरी भेट व फॉर्म मध्ये माहिती भरून देण्याच्या मोबदल्यात ७०० रुपयाची लाच स्विकारतांना विद्युत वितरण कंपनीचा कर्मचारी अनिल भास्कर आव्हाड हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. तक्रारदार यांचे नातेवाईक यांनी त्यांच्या घरी नवीन वीज मीटर बसविण्यासाठी म.रा.वि.वि. येवला कक्ष, येवला येथे ऑनलाइन अर्ज केला होता. सदर ऑनलाइन फॉर्म भरून मिळालेल्या पावतीवर सही करण्यासाठी, अर्जदार यांच्या घरी भेट देण्यासाठी, व फॉर्म मध्ये माहिती भरून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे २० फेब्रुवारी रोजी ७०० रुपये लाचेची केली होती तिची शहानिशा केल्यानंतर अनिल आव्हाड यानी पंचांसमक्ष मागणी करून तडजोडी अंती ती रक्कम स्वीकारली. यावेळेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेणा-या कर्मचा-याला रंगेहाथ पकडले. त्याच्या विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन पाटील, नितीन चौधरी, शितल सूर्यवंशी यांनी केली.