एमडी ड्रग्ज प्रकरणातील आंतर राज्य टोळीच्या मुख्य सूत्रधाराला सोलापूर पोलिसांकडून बेड्या

Spread the love

एमडी ड्रग्ज प्रकरणातील आंतर राज्य टोळीच्या मुख्य सूत्रधाराला सोलापूर पोलिसांकडून बेड्या

पोलीस महानगर टीम

सोलापूर – ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एमडी ड्रग तयार करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक केली आहे. दोघांनाही २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. मुख्य सूत्रधार फय्याज अहमद रसूल शेख (वय ५२, रा. बी २०, स्वीट सहारा अपार्टमेंट, राखेआळी रोड, जी. जी. कॉलेज रोड, वसई, जि. पालघर), रमेश नरसिंह आयथा (वय ४२, रा. गणेश नगर, बस स्टँड, मौलाअली, मलकजगिरी, हैदराबाद) अशी कोठडीतील संशयितांची नावे असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी बुधवारी (ता. २१) पत्रकार परिषदेत दिली. ऑक्टोबर महिन्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोहोळ तालुक्यातून चालणाऱ्या ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड केला होता. सलग झालेल्या कारवायामध्ये ग्रामीण पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचा एमडी ड्रग्स आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त केला होता. या प्रकरणी पोलिसांनी ड्रग्स निर्मिती करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुख्य सुत्रधारला कर्नाटकातल्या कलबुर्गी येथुन जेरबंद केले आहे तर, त्याच्या साथीदारास हैद्राबाद येथुन अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत १३ आरोपीना अटक केली आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार असलेला फय्याज शेख याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. शेख हा कर्नाटक, तमिळनाडु, आंध्रप्रदेश, राजस्थान या भागातील अशा प्रकारच्या गुन्हयाचा मुख्य सुत्रधार असुन याच भागात तो आपले अस्तित्व लपवुन राहत होता. तसेच आपली राहण्याची ठिकाणे सतत बदलत होता. त्यामुळे त्याचा सुगावा लागेपर्यंत पळून जाण्यात यशस्वी होता. १४ फेब्रुवारी रोजी हा आरोपी कर्नाटकतील कलबुर्गी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांची पथके कलबुर्गी येथे गेली आणि एका हॉटेलमध्ये त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या तसेच त्याच्या साथीदारास हैद्राबाद येथून अटक करण्यात आली.

या टोळीचा मुख्य सूत्रधार फय्याज शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरूध्द कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, चेन्नई, पालघर, नाशिक आदी ठिकाणी मिळून १० गुन्हे नोंद असल्याचे पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी सांगितले. शेख याचे शिक्षण जेमतेम दुसरीपर्यंत झाले आहे. मात्र त्याच्याकडे मेफेड्राॅन अंमली पदार्थ तयार करण्याचे तांत्रिक ज्ञान असल्याची माहितीही त्यांनी दिली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सहायक फौजदार श्रीकांत गायकवाड, हवालदार सलीम बागवान, विजयकुमार भरले, महिला पोलीस शिपाई दीपाली जाधव, अनवर आतार, विनायक घोरपडे, अक्षय डोंगरे, समर्थ गाजरे आदींनी सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon