घरातच छापल्या बनावट नोटा; नोटा छापणाऱ्या दोघांना अटक, पुण्यातील हिंजवडीतील घटना
पुणे – फर्जी या वेबसिरीजप्रमाणे तीन तरुणांनी घरातच बनावट चलनी नोटा छापल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. आयटी पार्क हिंजवडी परिसरात या बनावट चलनी नोटा घेऊन माण गावात जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले असून, या तिघांकडून १ लाख २० हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. अभिषेक राजेंद्र काकडे (वय २०), ओंकार रामकृष्ण टेकम (१८), दोघे रा. हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार श्रीकांत चव्हाण यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अभिषेक राजेंद्र काकडे, ओमकार रामकृष्ण टेकम आणि एक अल्पवयीन मुलाच्या विरोधात हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गु.रजि.क्रं.भादवी ४८९ क व ३४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.