पोलीस अधिकार्‍यांची आत्मचरित्रे पोलिसांना मार्गदर्शक : नरेंद्र वाबळे

Spread the love

पोलीस अधिकार्‍यांची आत्मचरित्रे पोलिसांना मार्गदर्शक : नरेंद्र वाबळे

मुंबई : वाचनाने माणसाचे व्यक्तिमत्व घडते. संस्कारक्षम वयातील वाचन माणसाचे चरित्र घडवीते. म्हणून प्रत्येकाने वाचलेच पाहिजे. विशेषत: पोलिसांनी निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची आत्मचरित्रे अवश्य वाचावीत. त्याचा त्यांना लाभच होईल, असे उद्गार मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी काढले.

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाने आयोजित केलेल्या नवोन्मेष व्याख्यानमाला – २०२४ चे पहिले पुष्प गुंफताना उद्घाटक व्याख्याते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त लोहमार्ग, मुंबई डॉ. रवींद्र शिसवे होते. प्रारंभी डॉ. शिसवे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. वाबळे यांचा सत्कार केला.

‘वाचन : एक सुखद प्रवास’ या विषयावर बोलताना श्री. वाबळे म्हणाले की, जन्माला आल्यावर माणसाचा जीवनप्रवास सुरू होतो. तो शाळेत जाऊ लागल्यावर लिहू-वाचू लागतो. त्यानंतर त्याचा वाचनप्रवास सुरू होतो. लहानपणी वाचलेली चांगली पुस्तके माणसाचे चरित्र घडवितात. आम्हाला आमच्या आईने वाचनाची गोडी लावली. आम्हा भावंडांना आई रोज दुपारी गोष्टी वाचून दाखवीत असे. त्या गोष्टीतील पराक्रमी आणि परोपकारी नायक नकळत आमचा हिरो बनत असे. त्या नायकाप्रमाणे आपणही परोपकारी व्हावे, इतरांना मदत करावी हे संस्कार बालपणीच वाचनामुळे आमच्यावर बिंबविले गेले.

आपण अनेक निवृत्त पोलीस अधिकार्‍यांची आत्मचरित्रे वाचली आहेत. त्यातील रमाकांत कुलकर्णी यांचे ‘फुटप्रिंटस् ऑन द सँड ऑफ क्राईम’, ज्युलियो रिबेरो यांचे ‘बुलेट फॉर बुलेट’ इत्यादी पुस्तके मला विशेष भावली. अगदी अलिकडच्या काळात माजी पोलीस महासंचालक राकेश मारीया, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सर्वश्री सुरेश वलीशेट्टी, विलास तुपे, व्यंकट पाटील आणि अरुण वाबळे यांची पुस्तके मला खूप आवडली. त्यातून गुन्हेगारी जगताविषयी महत्वाची माहिती मिळाली. त्यांपैकी अरुण वाबळे यांचे पुस्तक तर गुन्हा अन्वेषणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. आपण ते आपल्या पोलिसांना वाचायला सांगावे. तसेच अरुण वाबळे यांचे खास व्याख्यान पोलिसांसमोर अवश्य ठेवावे, असे आवाहन श्री. वाबळे यांनी आयुक्त डॉ. शिसवे यांना केले.

पोलीस आणि पत्रकार यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध समाजाच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात, असे सांगताना त्यांनी या संदर्भातील काही उदाहरणे दिली. कुविख्यात चार्ल्स शोभराज तिहार तुरुंगातून पळाला तेव्हा एका सांज दैनिकाने इन्सपेक्टर मधुकर झेंडे यांचा फोटो छापून त्यांनी पहिल्यांदा शोभराजला पकडले होते अशी बातमी दिली. ती बातमी तत्कालीन पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग यांनी वाचली. त्यानंतर त्यांनी झेंडे यांना बोलवून घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांचे एक पथक तयार केले. नंतर झेंडे यांच्या सूचनेवरूनच हे पथक शोभराजला पकडण्यासाठी गोव्याला रवाना झाले. पुढे काय घडले हा इतिहास ताजा आहे.

माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी वर्तमानपत्रातील एक बातमी वाचली. एक गुन्हेगार उजळ माथ्याने फिरत होता. पण तो फरारी असल्याचे पोलीस सांगत होते, अशी ती बातमी होती. बाळासाहेबांनी ताबडतोब राज्याच्या पोलीस महानिरिक्षकांना फोन करून त्या गुन्हेगाराला गजाआड करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी त्याला काही तासात पकडले. अशा काही मनोरंजक आठवणी सांगून श्री. वाबळे यांनी उपस्थित पोलीस अधिकार्‍यांना मंत्रमुग्ध केले.

उपायुक्त, मध्य परिमंडळ, लोहमार्ग मुंबई श्री. मनोज पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon