पुण्यात भोंदू बाबाने आयटी इंजिनिअर दांपत्याला १४ कोटींना गंडवलं!

Spread the love

पुण्यात भोंदू बाबाने आयटी इंजिनिअर दांपत्याला १४ कोटींना गंडवलं!

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – पुण्यात एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. एका भोंदू बाबाने आयटी इंजिनिअर आणि त्यांची शिक्षक पत्नी यांना “शंकर महाराज अंगात येतात, ते दुर्धर आजार बरे करतात” अशा अंधश्रद्धाजन्य प्रलोभनात अडकवून तब्बल १४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक डोळस हे आयटी इंजिनिअर असून त्यांची पत्नी शिक्षिका आहे. या दोघांना त्यांच्या दोन मुलींच्या आजारावर उपाय होईल, या आशेने भोंदू बाबा दीपक खडके आणि त्याची शिष्या वेदिका पंढरपुरकर यांनी जाळ्यात अडकवलं.

वेदिका पंढरपुरकर हीच्या अंगात “शंकर महाराज” येतात, असा दावा करत तिने डोळस दांपत्याला विविध “उपाययोजना” सांगितल्या. त्यानुसार त्यांनी आपली संपत्ती विकून ते पैसे वेदिका व दीपक खडके यांच्या बँक खात्यांमध्ये आरटीजीएसद्वारे वर्ग केले.

२०१८ पासून सुरू असलेल्या या फसवणूक प्रकरणात डोळस दांपत्याने केवळ पुण्यातीलच नव्हे तर इंग्लंडमधील घर आणि फार्महाऊसदेखील विकले. मात्र, त्यांच्या मुलींची तब्येत सुधारली नाही. त्यावर दोघांनी पुन्हा विचारणा केल्यावर खडके-पंढरपुरकर यांनी “घरात दोष आहेत” असा खोटा दावा केला.

यानंतर डोळस यांना राहते घर तारण ठेवून कर्ज काढायला भाग पाडण्यात आलं. पर्सनल लोन घेऊन दिलेला सगळा पैसा हडप करण्यात आला. या पैशातूनच दीपक खडके आणि वेदिका पंढरपुरकर यांनी कोथरुड येथील महात्मा सोसायटीत ‘आकाशदीप’ नावाचा आलीशान बंगला खरेदी केला असल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकरणाबाबत एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी वेदिका पंढरपुरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पत्रकार महात्मा सोसायटीतील त्यांच्या बंगल्यावर पोहोचले असता, तेथील कर्मचाऱ्यांनी “वेदिका आणि त्यांचे पती कुनाल तुम्हाला भेटू इच्छित नाहीत” असे सांगत भेट नाकारली.

या प्रकारामुळे पुणे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अंधश्रद्धेच्या नावाखाली होत असलेल्या अशा फसवणुकीविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon