रायगड जिल्ह्याचे पोलीस उप अधीक्षक संजय सावंत यांचा राजस्थानात अपघाती मृत्यू
रायगड – रायगड जिल्हा पोलीस दलात गृह विभागाचे पोलीस उप अधिक्षक संजय सावंत (५७) यांचा राजस्थानमधील जैसलमेरजवळ अपघातात मृत्यू झाला.त्यांच्या मोटरसायकलला जीप ने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते,उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.त्यांच्या मृत्यूच्या वार्तेने रायगड जिल्हा पोलीस दलात शोककळा पसरली आहे.संजय सावंत हे एक उत्तम खेळाडू होते.विविध प्रांतात मोटरसायकलवरून भ्रमण करणे व माहिती संकलित करणे हा त्यांचा छंद होता.अशीच भ्रमंती करीत असताना राजस्थानच्या जैसलमेर येथे माठीमागून येणाऱ्या जीपने त्यांना धडक दिली,या धडकेत ते लांब फेकले गेले व प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
५ जानेवारी,२००१ मध्ये त्यांना एपीआय पदावर पदोन्नती मिळाली होती,त्यानंतर ते मुंबई पोलीस दलाच्या विशेष सुरक्षा पथकात सामील झाले,त्यानंतर राज्य पोलीस नियंत्रण कक्ष व सायबर क्राईम ब्रॅंच येथे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम केले,त्यांच्या ज्ञानाचा अनुभव प्रशिक्षणार्थीना होण्यासाठी त्यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत बदली केली त्यानंतर मे २०२३ मध्ये त्यांनी रायगड जिल्हा उप अधीक्षक पदाची जबाबदारी घेतली.आपल्या ३४ वर्षाच्या पोलीस सेवेत त्यांना राष्ट्रीय व राज्य स्तरावरील विविध पोलीस पारितोषिके प्राप्त झाली आहेत.