काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी अखेर रद्द
मुंबई – राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आमदार सुनील केदार यांना दुसरा धक्का बसला आहे. सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. १५० कोटींच्या घोटाळा प्रकरणात न्यायालयाने त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता नियमानुसार त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, बहुचर्चित नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याचा शुक्रवारी निकाल लागला. या प्रकरणात कोर्टाने राज्याचे माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे विद्यमान आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांच्या कारावासाची आणि १२.५० लाख रुपये रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
सुनील केदार यांना २ वर्षांपेक्षा अधिक काळाची शिक्षा सुनावल्याने नियमानुसार त्यांची आमदारकी रद्द होणार असल्याची चर्चा होती. याबाबत पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधीमंडळास पाठवले होते. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर निर्णय घेतला असून सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. एकीकडे आगामी निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच ही कारवाई झाल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.