वाहन चोरी करणाऱ्या दोघांना बेड्या ; १५ दुचाकी वाहने जप्त
पिंपरी – पिंपरी चिंचवड परिसरात वाहन चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना चाकण पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १५ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. योगेश तुकाराम देवकर, दत्तात्रय गंगाराम गाडेबैल (दोघे रा. कवठे यमाई, ता. शिरूर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण परिसरात होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी चाकण पोलिसांचे एक वाहन चोरी विरोधी पथक तयार करण्यात आले. या पथकाने वाहन चोरी होणाऱ्या घटनास्थळावरील १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण करत दोघांची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी योगेश देवकर आणि दत्तात्रय गाडेबैल या दोघांना ताब्यात घेतले. त्या दोघांकडून १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.या कारवाईमुळे चाकण पोलीस ठाण्यातील सात, दिघी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित सहा दुचाकींच्या मूळ मालकांचा शोध चाकण पोलीस घेत आहेत.